पारनेर राजकीय

धक्कादायकचं…! अखेर सुजित पाटलांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल…!

पारनेर:- केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात निवेदन द्यायला गेलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामध्ये आज दि.17 रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदारांच्या दालनात शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला तब्बल चार तास अनेक प्रतिष्टीतांनी गुन्हा दाखल न होण्यासाठी प्रयत्न केले मात्र तहसीलदार गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्या अन संध्याकाळी साडेसहा वाजता पोलीस ठाण्यात सुजित पाटलांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. तहसिलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
आज गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालय पारनेर येथे माझी, तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन स्टाफ ची मिटिंग चालु असताना सुजित झावरे रा. वासुंदे ता.पारनेर यांनी त्यांचेसह पाच पेक्षा जास्त व्यक्तिसह माझ्या दालनात विनापरवानगी अचानक प्रवेश करुन मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागले व मला उद्देशून बिनबुडाचे आरोप करु लागले. समोर बसलेल्या माझ्या स्टाफसमोर माझा अपमान करु लागले. केवळ 5 व्यक्तीनी निवेदन द्यायला या असे सांगुनही सुजित झावरे यांनी त्यांचेबरोबर आलेल्या लोकांना तुम्ही सगळे आत यारे बघु काय होते ते? असे म्हणुन खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. त्यावेळी मी त्यांना जाणिव करुन दिली की, आपण यापुर्वी ही मला फोनवरुन अश्लिल शिवीगाळ करुन मला लज्जा निर्माण होईल असे बोललेले आहात. मला सर्वासमक्ष त्याची आठवण करुन देण्यास भाग पाडु नका.
मा.जिल्हाधिकारी यांचे कलम 144 व 37(1)(3) चे आदेश आहेत. कृपया प्रशासनास सहकार्य करा व 5 पेक्षा जास्त व्यक्ती दालनात आणुन माझ्या दालनात गोंधळ घालु नका सामाजिक अंतर पाळा कोरोनाची साथ सुरु आहे. त्यावर सुजित झावरे म्हणाले की. तहसिल कार्यालय व दालन आमचे आहे, तुमचे नाही, आम्ही वाटेल ते करु म्हणुन जोराजोरात हातवारे करुन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व सर्व जमाव एकत्र करून मी महिला अधिकारी असल्याने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी माझ्या स्टाफ समोर बेइज्जती झाली.
माझ्या कार्यकारी दंडाधिकारी पदाचा अपमान झाला मी त्यांना समजावुन सांगितले की, मी कार्यकारी दंडाधिकारी आहे. माझा अपमान करु नका. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही आमचे काही करु शकत नाही, आम्ही तुमचा आदेश जुमानणार नाहीत. मला पुन्हा त्यांनी धमकावुन दबाव आणला त्यामुळे मला माझी महत्वाची मिटिंग बरखास्त करावी लागली व स्टाफ समोर मला नाहक अपमानास्पद वागणुकीला समोरे जावे लागले.
तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.48 वा. सुजित झावरे रा. वासुंदे ता.पारनेर यांनी त्यांचे मोबाईल नंबर वरुन माझे मोबाईल नंबरवर फोनवरुन अश्लिल भाषेत मला लज्जा निर्माण होईल असे बोलले. मी महिला अधिकारी असल्याने माझे मनोधैर्ये खच्चिकरण केले. तसेच मागील 4 ते 5 महिन्यापासुन सुजित झावरे रा वासुंदे, ता.पारनेर यांनी “मला महिन्याला 50 हजार रुपये देत जा, नाही दिले तर मी तुमची तक्रार मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे करेल. परंतु मी त्यांना एकदाही काही एक रुपये दिले नाही. माझी आई सुप्रिया झावरे या जिल्हा परिषद सदस्या असुन त्यांना मी तुमच्या विरुध्द वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार द्यायला लावेल” अशी धमकी दिली होती. तरीही मी सुजित झावरे यांचे धमकीला जुमानले नाही, त्यांना कधीही रुपये दिले नाहीत.
सुजित झावरे रा वासुंदे ता पारनेर यांनी आमचे शासकीय कामात अडथळा केला व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन लोकांना चिथावणी देवून तहसिलदार कार्यालयाचे दालनात गर्दी केली व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे उल्लंघन केले. तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्या 1897 चे उल्लंघन केले. आम्ही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर या महिला असल्याने आमचे आदेश पाळले नाहीत. आमच्यावर दबाव आणुन आमचेवर दमदाटी केली. अश्लिल आरोप व शिवीगाळ करुन मानहाणी केली, मानभंग केला सर्वासमोर मला लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. तसेच महिन्याला 50 हजार रुपये मला देत जा. नाही दिले तर मी तुमची जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे तक्रार करेल अशी धमकी दिली होती म्हणुन माझी सुजित झावरे यांच्या विरोधात फिर्याद आहे असे दिलेल्या फिर्यादीत तहसिलदार देवरे यांनी नमुद केले आहे.
या प्रकरणी पारनेर पोलिसांनी झावरे यांच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे करीत आहेत……
तुषार भाटीया,पारनेर

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी