महाराष्ट्र राजकीय

धमक्या कुणाला देता?: चंद्रकांत पाटील

पुणे: मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता? असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना सोमवारी दिले. करोनाच्या संकटकाळात भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कदम यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये,’ अशी टिप्पणी विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. ‘आपण फकीर आहोत. आपल्यावर टीका-टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजीत कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला, त्यावेळी आपण काय केले? असा सवाल त्यांनी केला. मुळात आता संपूर्ण देश आणि राज्य करोनाच्या महाभयानक संकटाचा सामना करत असताना, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत, यांचे त्यांनी उत्तर द्यावे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

करोनाच्या संकटात भाजप सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील ४६ लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे. अशा स्थितीत पालकमंत्र म्हणून भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला, त्यावेळी आम्ही काय‌ केले? याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. पुराचा फटका बसलेल्या ४ लाख ७० हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले व पंधरा दिवस त्यांच्या भोजनाची आणि निवाऱ्यांची व्यवस्था केली. त्या लोकांना रोज साठ रुपये निर्वाह भत्ताही दिला. आसरा घेतलेले लोक परत आपल्या घरी जाण्यास निघाले, त्यावेळी त्यांना भांडीकुंडी व कपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले. तसेच सहा महिन्यांचे रेशनही दिले. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी