पारनेर

माजी विद्यार्थ्यी, ग्रामस्थांच्या सहभागातून एक कोटी रुपये खर्चाची अद्ययावत इमारत उभारणार…

पारनेर:- अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभागातून येथील सेनापती बापट विद्यालयासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून अद्ययावत इमारत उभारण्याचा निर्धार आज झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.मेळाव्याचा प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणातील सेनापती बापटांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य सुनील खिस्ती, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिरीष शेटीया,विद्यालयाचे पर्यवेक्षक रावसाहेब कासार, परिवहन अधिकारी पद्माकर भालेकर, विलास कटारीया, नगरसेवक नंदकुमार देशमुख, बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे, विजय डोळ, प्रकाश घोडके,संतोष गांधी, गणेश मगर, डॉ.बाळासाहेब कावरे,दत्तात्रेय औटी, राजेंद्र औटी,राजू शेख, विरेंद्र परदेशी,दत्ता शेरकर, रेश्मा अगरवाल,अमित जाधव, विलास तराळ आदी उपस्थित होते.
सन १९५४ मधे स्थापना झालेल्या सेनापती बापट विद्यालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम साठ वर्षांपूर्वी झाले आहे.त्यानंतर काही वर्षांपूर्वी सहा वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले.मात्र सध्या विद्यालयाच्या या इमारती अपुऱ्या पडत आहेत.मुख्य इमारतीची डागडुजी करणे आवश्यक आहे.तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या, भविष्यात कनिष्ठ महाविद्यालयाची होणारी वाढ विचारात घेऊन बारा वर्ग खोल्यांची अद्ययावत दुमजली इमारत उभारण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात घेण्यात आला.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदांवर आहेत.प्रसंगानुरूप शाळेला भेट देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी भरीव काही करण्याची इच्छा व्यक्त होत असते.त्याच बरोबर विविध वर्गांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातही शाळेला मदत करण्याविषयी चर्चा होते.या सर्व बाबी शाळा व्यवस्थापन समितीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडल्या.नवीन विस्तारीत इमारतीची गरज अधोरेखित केली.माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन अद्ययावत इमारत उभारण्याचा निर्णय घेतला तर संस्था मागे राहणार नाही.जेव्हढी रक्कम माजी विद्यार्थी,ग्रामस्थ उभी करतील तेव्हढीच रक्कम संस्था खर्च करील सर्वांच्या सहकार्यातून अद्ययावत इमारत उभारण्यात येईल असा शब्द संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदीया यांनी दिला असल्याची माहिती विलास कटारीया यांनी यावेळी दिली.
करोना संसर्गाच्या उच्चाटनानंतर जगण्याची, विविध क्षेत्रातील व्यवस्थापना बरोबरच शाळा व्यवस्थापनाची समिकरणेही बदलणार आहेत.या बदलत्या समीकरणांबरोबर जुळवून घेणारी, भविष्यातील अश्या प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अद्ययावत इमारत, प्रशस्त आणि हवेशीर वर्गखोल्या उभारण्याची सूचना संजय वाघमारे यांनी केली.
नंदकुमार देशमुख,डॉ.बाळासाहेब कावरे, विजय डोळ,शिरीष शेटीया,प्रकाश घोडके,अमित जाधव,रेशमा आगरवाल,लहू भालेकर, हितेश शेटीया आदींची भाषणे झाली.गोरक्ष पठारे यांनी प्रास्ताविक केले.दिगंबर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.तर सुनील गायकवाड यांनी आभार मानले…….

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी