कोल्ड प्ले कॉन्सर्ट तिकिट विक्रीत काळ्या बाजाराच्या आरोपांबाबत उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका दाखल करण्यात आली होती. ही जनहित याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
कोल्डप्लेच्या नवी मुंबई (navi mumbai) कॉन्सर्टसाठी (concert) ऑनलाइन तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे आरोप समोर आले आहेत. मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भातील याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना अशा पद्धतींविरुद्ध सरकारकडे मार्गदर्शक तत्त्वे मिळविण्याचा सल्ला दिला.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, धोरणात्मक निर्णय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर कायदेमंडळ किंवा सरकारच्या अखत्यारीत येतो.
अमित व्यास यांनी दाखल केलेल्या याचिकेत कॉन्सर्ट आणि लाईव्ह शोसारख्या प्रमुख कार्यक्रमांच्या तिकीट विक्रीत अनियमितता असल्याचा दावा करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने आरोप केला होता की, बुक माय शो द्वारे विकल्या जाणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली.
काही चाहत्यांनी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील तिकिटांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले. याचिकेत आयपीएल सामने, 2023 चा क्रिकेट विश्वचषक आणि टेलर स्विफ्ट आणि दिलजीत दोसांझ यांच्या संगीत कार्यक्रमांदरम्यान काळाबाजार झाल्याच्या अशाच घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याने आयोजक आणि तिकीट प्लॅटफॉर्मवर दुय्यम तिकीट वेबसाइटवर तिकिटांच्या किमती वाढवून चाहत्यांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, ही पद्धत नागरिकांना सार्वजनिक मनोरंजनासाठी समान संधी नाकारते आणि तिकीट उद्योगात स्पष्ट नियमांचा अभाव अधोरेखित करते.
न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अशा अनियमितता रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी सरकारला औपचारिक निवेदन सादर करण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा
Leave a Reply