[ad_1]
जगात कोण कसा आपला ठसा उमटवेल? याचा पत्ता नसतो. काहीजण प्रचंड प्रतिभेचे धनी असतात. ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर अवघ्या जगाला वेड लावतात. कुणाची वाणी, तर कुणाची लेखणीही अनेकांना वेड लावते. अशा थोर लोकांचा सहवास लाभला की आपलीही उंची आपसूकच वाढते. किंबहुन
.
चला तर मग ‘धुरंधर’ मालिकेत आज आपण प्रकाश टाकूया नरहर कुरुंदकर यांच्या जीवनपटावर…
नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी मराठवाड्यातील नांदापूर (जि. हिंगोली) येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी 1955 साली नांदेडच्या प्रतिभा निकेतन संस्थेतून शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपदही भूषवले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनवेळा त्यांच्याकडे बिनविरोधपणे चालून आले. पण त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला.

आदर्श शिक्षक अन् बरेच काही…

आपल्याकडची विचारवंत मंडळी सहसा अमुक जातीची, तमुक राजकीय विचारसरणीची किंवा एखाद्या नेत्याचे अनुयायी म्हणून ओळखली जाते. असे विचारवंत राजकारणाच्या बेड्या पायात ठोकूनच पुढे झेपावण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आजच्या या वैचारिक काळोखात नरहर कुरुंदकर झगमगून दिसतात.
अष्टपैलू व स्वकर्तृत्वाने संपन्न व्यक्तिमत्व असणारे नरहर कुरुंदकर मराठवाड्यात गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी एक आदर्श शिक्षक, प्राचार्य, विचारवंत, संशोधक, समीक्षक, व्याख्याते, लेखक, मार्गदर्शक आदी विविध भूमिकांमधून आयुष्यभर समाजमनाला योग्य ती दिशा देण्याचे काम केले. त्यांना कोणत्याही विषयाचे वावडे नव्हते. त्यांचे शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानापासून मार्क्सवादापर्यंत विविध विषयांवर अभूतपूर्व प्रभुत्व होते.
भालचंद्र कहाळेकर हे कुरुंदकरांचे गुरू होते. त्यांच्या जडणघडणीत त्यांचा विशेष वाटा होता. मराठी भाषेचे प्राध्यापक असणारे कहाळेकर मार्क्सवादी राष्ट्रभक्त होते. कुरुंदकर त्यांच्याविषयी बोलताना एकेठिकाणी म्हणतात, ‘कशाचा विचार करावा, यापेक्षा विचार कसा करावा हे त्यांनी मला शिकवले.’ विचारवंत म्हणून कुरुंदकरांच्या मनावर महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, विल ड्युरंट, आचार्य जावडेकर, रसेल, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, विल ड्युरंट, बर्ट्रेंड रसेल आदींच्या विचारांचा व लिखाणाचा मोठा प्रभाव होता. विशेषतः ते मार्क्सवादाचे चाहते होते.

कुरुंदकरांच्या मते, सामाजिक व्यवस्थेचे मूळ ‘अर्था’मध्ये म्हणजेच संपत्तीत आहे. जडवादी वा भौतिक विचार हा अन्य कोणत्याही विचारांपेक्षा अधिक प्रभावी असतो. पण त्यांनी अत्याधिक आदर्शवादाचा विचार केव्हाही मांडला नाही. विचारवंतांनी मांडलेले विचार वास्तवात अंमलात आणणे शक्य झाले पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या जागर या पुस्तकात प्रगतीवादी व आदर्शपणाच्या गप्पा मारणाऱ्या, पण प्रत्यक्षात तसे न वागणाऱ्या ताकदींच्या दिखाऊपणाचा बुरखा फाडला. ते राष्ट्र सेवादल या संघटनेत आयुष्यभर सक्रिय होते. किंबहुना राष्ट्रसेवा दलाच्या वैचारिक बांधणीत त्यांचा सिंहाचा वाट होता.
समताधिष्ठित विचारांवर भर
नरहर कुरुंदकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समिक्षा अशा विविध विषयांवरील मुलगामी मते बिनधोकपणे मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. ते आपल्या ‘मनुस्मृती: काही विचार’ या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, सारी हिंदू परंपराच विषमतेची समर्थ परंपरा आहे. या परंपरेत निर्माण झालेल्या सगळ्याच ग्रंथांतून विषमतेचे स्पष्टीकरण असणार. मनुस्मृती हा त्रैवर्णिकांचे ब्राह्मण – क्षत्रिय – वैश्यांचे हितसंबंध जपणारा ग्रंथ आहे. शूद्रांच्या जीवनात स्वाभिमान व प्रतिष्ठेचा प्रश्नच निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर शूद्र दरिद्रीच राहिला पाहिजे हे मनू अचूकपणे जाणतो व हे करण्यासाठी ब्राह्मण व क्षत्रियांनी एकजूट केली व शूद्रांना गुलाम करणारी समाजरचना निर्माण केली.
नरहर कुरुंदकरांच्या या विचारांवरून त्यांचे समताधिष्ठित विचार स्पष्ट होतात. त्यांच्या या विचारांवर अनेकांनी मतमतांतरे व्यक्त केली. पण त्यांच्या विचारांना तोड देणारा एक स्पष्ट विचार कुणाला मांडता आला नाही हे तेवढीच खरे आहे.
कुरुंदकर स्वतः मार्क्सवादी विचारसरणीचे होते. म्हणूनच त्यांच्या या ग्रंथात काहीशी विद्रोहाची छटा आढळते. पण ही बाब काहीशी बाजूला ठेवली तरीही मनुस्मृतीचे म्हणजेच तदनुषंगाने प्राचीन भारतीय जीवन पद्धती व मूल्ये यांचे एक इहवादी स्पष्टीकरण म्हणून हा ग्रंथ निश्चितच महत्त्वाचा ठरतो.

कुरुंदकरांच्या प्रत्येक विधानाला तर्क, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म आणि कित्येक महत्त्वाच्या गोष्टींचा आधार असतो. कुठेही सैलसरपणा, चलाखी, दडपून नेण्याची वृत्ती नाही, पुराव्याचा अभाव नाही, कुठलाही पुर्वग्रह नाही. ज्यांच्यावर कुरुंदकर प्रेम करतात त्यांच्या लेखनाचा परमर्ष घेतानाही ते झुकते माप देत नाहीत.
समाजाचा लोभ असेपर्यंतच मरण्यात अर्थ

लातूर येथे एका मित्राशी बोलताना कुरुंदकर म्हणाले होते, ‘आपली गरज कायम आहे व समाजाचा लोभ शाबूत आहे तोवरच मरण्यात अर्थ आहे.’ त्यांच्या या विधानावरूनही त्यांच्या विचारांची प्रगल्भता दिसून येते.
ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार एके ठिकाणी सांगतात, चाळीसेक वर्षांपूर्वीच्या एका हिवाळ्या रात्री दोन-अडीचच्या सुमारास कुरुंदकर चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजरच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून उतरले. त्यांना उतरून घ्यायला आम्ही काहीजण फलाटावर थांबलो होतो. स्थानकावर चहा घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘आता जरा तंबाखूचं पान बघा.’ त्या एका वाक्याने आमच्यातील अंतर घालविले.
परभणीतील एका मराठा परिषदेत त्यांनी शिवाजी महाराजांवर एक प्रदीर्घ आणि अप्रतिम भाषण दिले आणि सगळा श्रोतृवृंद त्या भाषणाने धुंद झाला असताना त्यांनी समारोप केला.

‘शिवाजीराजा महान होता, हे आता कोणाही इतिहासकाराने नव्याने सांगण्याची गरज नाही. पण तुम्हा मराठ्यांनी शिवाजी आपला मानण्याचे कारण नाही. शिवाजी स्वत:ला राजपूत म्हणवीत होता.’ या समारोपाने सभेची धुंदी उतरली आणि तिने वक्त्यांच्या निषेधाचा ठराव त्याच सभेत तात्काळ मंजूर केला. खूप दिवसांनी या प्रसंगाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘इतिहासपुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी हे धक्के आवश्यकच आहेत’.
कुरुंदकरांची मांडणी नाकारणे कुणाला जमणारे नव्हते. त्यांचा निषेध हा सोपा मार्ग होता.
विचारांच्या पोथीनिष्ठ आंधळेपणाला विरोध
पंडित नेहरू ही कुरुंदकरांची एक नाजूक जागा होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरू नेमक्या कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल अभ्यास केला होता. यदुनाथ थत्ते व नरहर कुरुंदकर या जोडीने राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे प्रबोधन केले त्याच्या केंद्रस्थानी नेहरूच होते.

बांगलादेश युद्धानंतरच्या 3-4 वर्षांत भारतात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तिचे विश्लेषण करताना त्यांनी 1971 चा युद्धखर्च, 1972 चा दुष्काळ व 1973 चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या हातात नसल्याने या 3 गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून उरलेला दोष शासनाचा असे परखडपणे सांगितले होते. पण त्याचवेळी त्यांनी आणीबाणीचा कडाडून विरोध केला होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्याचे धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. कुरुंदकर विचाराने डावे असले तरी त्यांनी त्याचे पोथीनिष्ठ आंधळेपण केव्हाही मानले नाही.
स्वातंत्र्य म्हणजे काय?
कुरुंदकरांनी अभयारण्य ग्रंथात स्वातंत्र्याची फार सोपी व्याख्या समजावून सांगितली आहे. ते सांगतात, स्वातंत्र्य म्हणजे काय? तर समाजाने व्यक्तींचे जे हक्क मान्य केले व ज्या मर्यादेत मान्य केले ते हक्क त्या मर्यादेत भोगावयास सापडणे म्हणजे स्वातंत्र्य.
शुद्ध तात्त्विक भाषेत हा मुद्दा असा मांडता येईल की, बंधने व स्वातंत्र्य या कल्पना परस्परविरोधी नसून, सुसंगत आहेत. या दोन्ही कल्पना समाज स्वेच्छेने स्वीकारतो त्यावेळी बंधने स्वातंत्र्याचा भाग असतात. पण ज्यावेळी या दोन्ही संकल्पना समाजावर लादल्या जातात त्यावेळी स्वातंत्र्य हा बंधनाचाच अविष्कार असतो.

स्वातंत्र्य आणि बंधने या दोन्ही कल्पना व्यवस्थेचा भाग आहेत. या व्यवस्थेकडे उचित म्हणून पाहणारे तिला स्वातंत्र्य मानतील. तर या व्यवस्थेकडे अनुचित म्हणून पाहणारे एका निराळ्या उचित व्यवस्थेचा पुरस्कार करतील. कारण स्वातंत्र्य व बंधने या कल्पना विरोधी भासतात, पण त्या विरोधी नाहीत.

कुरुंदकर म्हणतात, विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच, पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता आहे असेही मी मानतो. पण हे विचारस्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करमाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते. व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे, व्यक्तीचे हक्क मान्य करून व केल्यामुळे, व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे, स्वातंत्र्य निर्माण होत असते.
कुरुंदकर कलावादी, जीवनवादी की सौंदर्यवादी होते?
समीक्षेच्या क्षेत्रात नरहर कुरुंदकर हे कलावादी होते, जीवनवादी होते की सौंदर्यवादी होते याविषयी वादंग आहे. कुरंदकरांची सारी साहित्यमीमांसा, समीक्षा वाचूनही आपण आपला एकेरी दृष्टिकोन बाजूला सारीत नाही. त्यांनी सतत ‘काय’ सांगावे आणि ‘कसे’ सांगावे या विषयी समन्वयवादी भूमिका घेतली. आपल्या चिंतनाच्या पातळीवर ते एकाच वेळी वाङ्मयाचे स्वरूप, प्रयोजन आणि कार्य या संदर्भात या दोन्ही विचारसरणींचा समन्वय घडवून आणत राहिले. जीवनात त्यांनी सांस्कृतिक मूल्य अधिक जपल्याने जीवन आणि त्याचे अर्थनिर्णयन यात ते कलेचे महत्त्व आवर्जून सांगून जातात.

कुरुंदकरांनी स्वातंत्र्याचे व्यामिश्र स्वरूप तितक्याच पोटतिडिकीने स्पष्ट करताना कलेचे स्वातंत्र्य आणि कलावंताची सामाजिक बांधिलकी यांचा श्रद्धापूर्ण आलेख वेळोवेळी वाचकाच्या, अभ्यासकाच्या डोळ्यापुढे ठेवला. जीवनातले वास्तव आणि स्वप्न आणि त्याचे भवितव्य रंगविताना नैतिकता आणि संस्कृती यांचा अत्युच्च संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी समीक्षा लेखन केले.
बाई, आता फार पुढे सरकू नका…
सुरेश द्वादशीवार एकेठिकाणी आणखी किस्सा सांगतात, महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम वक्त्याच्या वाणीवर लुब्ध झालेल्या एका पदवीधर युवतीने आपण त्याला मनाने वरले असल्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा मांडली आणि त्या विवाहित व पापभिरु वक्त्याची तारांबळ उडवून दिली. तिच्या प्रेमाचे खरेपण असे की त्या वक्त्यांच्या आठवणींनी ती बेभान व्हायची आणि त्या अवस्थेत तिला अतिशय देखण्या कविता स्फुरायच्या. या मुलीला भानावर आणायला कुरूंदकरांनी केलेला प्रयोगही तसाच विलक्षण होता. त्या वक्त्यांशी तेही मैत्रीने बांधलेले होते. तिच्या शहरात कुरूंदकरांनी तीन व्याख्याने दिली आणि तिच्या आमंत्रणावरून ते तिच्या घरी जेवायला गेले. आपल्या कवितांची वही दाखवायला जेव्हा ती त्यांच्याजवळ आली तेव्हा प्राचार्य महाशय म्हणाले, ‘बाई, आता फार पुढे सरकू नका. कारण तुम्ही आणखी पुढे सरकाल तर मग मागे सरकायला मी तुमचा तो नाही.’
बाई हबकल्या. संतापल्या. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘रागावण्याचं कारण नाही. तुम्हाला प्रेमासाठी पुरुष हवा, तो नाही म्हणतो, मी तयार आहे. माझ्यावर प्रेम करा.’ त्यावर त्या बाईंनी आपल्या प्रेमाची कहाणी ज्या तऱ्हेने त्यांना सांगितली तिने ते गहिवरले. त्या प्रेमात नावाची, लग्नाची, प्रतिष्ठेची किंवा देहाची अशी कोणतीही मागणी नव्हती. फक्त मनाने आपले मानायचे एवढीच एक अट होती.
कुरूंदकरांनी तिचा निरोप घेतला. वक्त्यांचे गाव गाठले आणि त्यांच्याजवळ जमा झालेल्या त्यांच्या या अनोख्या प्रेयसीच्या सगळ्या कविता घेऊन ते नांदेडला परतले. पुढे एका दिवाळी अंकात त्या कविता आपल्या प्रस्तावनेसह ‘राधेच्या कविता’ म्हणून त्यांनी प्रकाशीत केल्या. हा त्यांच्यातल्या मैत्रीतील सहृदयतेचा भाग होता. त्यांच्यातला कार्यकर्ता अजून शांत व्हायचा होता. नांदेडला पोहचल्यापासून दर आठवड्याला बाईंना एक कार्ड टाकण्याचा त्यांनी नेम केला. या कार्डावर फक्त एक वाक्य असे. ‘बाई, आता लग्न करा.’
ही सगळी हकिकत त्यांनीच मला त्या वक्त्यांच्या उपस्थितीत सांगितली. म्हणाले, ‘वर्षभराच्या या पोस्टकार्डांना यश आले आणि बाई एकदाच्या लग्नाला तयार झाल्या. मात्र त्यांनी आम्हाला एक अट कळविली. त्या लग्नाला मी आणि वक्त्यांनी येऊ नये. पण आम्ही गेलो, अक्षता वगैरे टाकून, पुत्रवती भव् असा आशीर्वाद देऊन परत आलो.’ सगळी कहाणी हसून सांगणाऱ्या कुरूंदकरांचा कंठ मात्र त्यावेळी रुध्द झाला होता.
कुरुंदकरांना टाळून पुढे जाणे शक्य नाही

साहित्यात कल्पना, भावना आणि विचार ज्या अनुभूतीद्वारे शब्दबद्ध करायचा त्यावेळी त्यातले सौंदर्य आणि वास्तव परस्परांना पूरक, रसिकनिष्ठ असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे ज्या कुणाला राजकारण, गुंतागुंतीचा हिंदू-मुस्लिम प्रश्न, समाजकारण, मराठी साहित्य, भारतीय परंपरा व संस्कृती आदी विषयांचा विचार करायचा असेल आणि मराठी भाषा ही वाचनाची मर्यादा असेल तर तुम्हाला कुरुंदकरांसारखा लेखक टाळून पुढे जाणे शक्य नाही. कुरुंदकरांनी अनेक विषयांचा चिकित्सक अभ्यास कर्तव्य मानून केला आणि ही त्यांच्या लेखणाची प्रेरणा होती.
नरहर कुरुंदकरांचे लोकशाहीवरील विचार आजही समर्पक वाटतात. ते ‘जागर’च्या प्रस्तावनेत म्हणतात,

‘गेली कैक वर्षे आपण राजकारणाचा चिकित्सकपणे अभ्यास करणे सोडूनच दिलेले आहे. जाहीर सभेतील व्याख्याने, पुस्तके व लेख यांच्या आधारेच आपण राजकारणाचा विचार करीत आहोत. राजकारणाचा विचार राजकीय प्रवाहाच्या संदर्भात करायचा असतो व राजकीय नेत्यांच्या वर्तनाची त्यांच्या व्याख्यानांत सुप्तपणे दडलेल्या ध्वन्यर्थाशी संगती लावून राजकारणाचा विचार करायचा असतो, ही शिस्तच आपण सोडून दिलेली आहे.’
वर्णव्यवस्थेचा सम्यक दृष्टीने अभ्यास
कुरुंदकरांनी प्राचीन भारतातील विसंवादांनी भरलेल्या वर्णव्यवस्थेचा अत्यंत सम्यक दृष्टीने अभ्यास केला. यासंबंधी ते म्हणतात की, वर्णव्यवस्था कधी अस्तित्वात नव्हती. अस्तित्वात होती ती जातीव्यवस्था. धर्मग्रंथातील संदर्भाशिवाय वर्णव्यवस्थेचे प्रत्यक्ष व्यवहारात कुठेही अस्तित्व नव्हते. वर्णव्यवस्थेच्या नावाने जातिव्यवस्थेचे समर्थन होते म्हणून वर्णव्यवस्थेचा विरोध करावा लागतो.
कुरुंदकर बौद्ध धर्माच्या मर्यादा स्पष्ट करून त्या धर्माचे ऐतिहासिक श्रेष्ठत्वही स्पष्टपणे नमूद करतात. या अनुषंगाने ते असे म्हणतात, की जगाच्या संस्कृतीला भारताने दिलेली बौद्ध धम्म ही सर्वांत मोठी देणगी आहे. बौद्ध धम्म इतर धर्मांपेक्षा वेगळा असून तो केवळ धर्म नाही, तर ते अखंड त्याग व सेवाभावाचे वलय असलेले एक अभियान आहे.

तुलनात्मक विचार करता सर्वसमावेशक जागतिक धर्म असे हिंदू धर्माचे स्वरूप नव्हते. प्रसरणशीलता धर्माचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. परंतु हिंदू धर्मास हे तत्त्व लागू पडत नाही. कुरुंदकर पुढे असे म्हणतात की, चित्र, शिल्प, मूर्ती ह्या कलांच्या क्षेत्रात सगळी भारतीय संस्कृती बौद्धांची अनुयायी आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातही हेच सत्य आहे. हे ऐतिहासिक सत्य कोणताही पूर्वग्रह न ठेवता कुरुंदकर निर्भीडपणे मांडतात. भारतीय इतिहासातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचा त्यांनी तटस्थपणे शोध घेतला आहे.
व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास
नरहर कुरुंदकर मॅट्रीक पास झाले तेव्हा त्यांची पुस्तके बीएच्या अभ्यासक्रमासाठी लावण्यात आली होती. आणि ते बीए ‘ना’पास झाले तेव्हा एमएचे विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करत होती. त्यांची भाषणे जेवढी लोकांना चक्रावून टाकत होती, तेवढाच त्यांच्या मृत्यूनेही जनेतला चक्रावून टाकले.10 फेब्रुवारी 1982 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (तत्कालीन औरंगाबाद) त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आपल्या भाषणाची सुरुवात करताच ते हार्ट अटॅकने व्यासपीठावरच कोसळले. त्यावेळी ते अवघ्या 50 वर्षांचे होते. कुरुंदकर ऐन पन्नाशीत गेले. त्यांच्या मृत्यूचा धक्का केवळ मराठवाड्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला बसला.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुरुंदकरांच्या निधनावर फारच मार्मिक शब्दांत भाष्य केले होते.
ते म्हणाले होते…

‘तू कसलेली विचारांची शेतं, पहिली वहिली कणसं धरत होती. अन् कणसाच्या कसदार दाण्यात, भरू लागलं होतं टचटचून दूध. त्या दुधाच्या मुक्या हाळीनं, झेपावू लागले होते पाखरांचे थवे दाही दिशांनी… पण विचारांच्या सुगीचे स्वप्न साकारत असतानाच कोसळलास.’
[ad_2]
Source link
Leave a Reply