मुंबई, 29 जुलै : आजच्या काळात कोण कधी कुठल्या घोटाळ्यात किंवा फसवणुकीत अडकेल, याबद्दल काहीच सांगता येत नाही. कारण इतक्या चित्रविचित्र आणि सहज समजून घेता येणार नाहीत अशा गुंतागुंतीच्या घटना घडत असतात. सध्या आशिष आणि शिवांगी मेहता हे मुंबईतलं दाम्पत्य अशाच एका घोटाळ्यात अडकलं आहे. त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत; मात्र आपल्याला खोट्या प्रकरणात विनाकारण गोवलं गेलं असून, आपण निष्पाप असल्याचा त्यांचा दावा आहे. पोलिसांनी अटक करू नये, म्हणून हे दाम्पत्य सध्या वकिलाच्या सल्ल्यावरून भूमिगत आहे. तसंच, आशिष मेहता यांची कंपनी गुंतवणुकीशी संबंधित असल्याने त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे नक्की परत मिळतील, अशी ग्वाहीही दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे जाणून घेऊ या. आशिष मेहता हे डिजिटल करन्स एंथुझिअॅस्ट आणि बिझनेसमन असून, ब्लिस कन्सल्टंट्स नावाची त्यांची स्टॉक ब्रोकिंग फर्म आहे. मेहता यांची ही फर्म आपले 200 कोटी रुपये देणं लागते, असा दावा एका कंपनीने केल्यामुळे मेहतांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्या संदर्भातला खटला कोर्टात सुरू आहे. ‘सध्या आमच्याकडे रोजच्या खाण्याइतकेही पैसे नाहीत,’ असं मेहता दाम्पत्याने म्हटलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातल्या ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणातही त्यांचं नाव आलं आहे. हा सगळा प्रकार खोटा असून, आपल्याला जाणीवपूर्वक त्यात गोवण्यात आलं आहे, असा दाम्पत्याचा दावा आहे. गोरेगावमधल्या ओबेरॉय एस्क्वायर या एका उच्चभ्रू टॉवरमध्ये हे दाम्पत्य राहतं.
Shinde Vs Thackeray : इर्शाळवाडी दुर्घटनेवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; नेमकं काय घडलं?
कथितरीत्या ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या निसार खान (39) नावाच्या एका व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी 6 जून 2023 रोजी अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं, की तो 17 लाख रुपये किमतीचं 142 ग्रॅम मेफेड्रोन हे ड्रग मेहता यांच्या सांगण्यावरून पुरवत होता. या आरोपासंदर्भातलं वृत्त मिड-डेने 16 जून रोजी प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर जवळपास महिन्याभराने 28 वर्षांच्या एका ट्रक ड्रायव्हरने छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यातल्या गेंदातोला पोलिस स्टेशनला मेमोरँडम पाठवून असा दावा केला, की तो मेहता दाम्पत्यासाठी काम करत होता. 2021मध्ये 88 लाख रुपये किमतीच्या वाहतूक करणारा ट्रक गेंदातोला पोलिसांनी जप्त केला होता. तो ट्रक प्रवीण ऊर्फ प्रधान नावाचा ड्रायव्हर चालवत होता. एके ठिकाणी ट्रक चिखलात अडकल्यानंतर ट्रक तिथेच सोडून प्रवीण पळून गेला होता. गेंदातोला पोलिसांनी तपासणी केल्यावर त्यांना त्यात मिठाच्या पोत्यांखाली ड्रग्जच्या पिशव्या आढळल्या. पोलिसांनी ट्रकमालक सत्पालसिंह आणि ड्रायव्हर प्रवीण यांना हरयाणातून शोधून काढलं आणि त्यांना अटक केली. ते हरियाणाच्या झांझर जिल्ह्यातले आहेत. मेमोरँडममध्ये प्रवीणने असा दावा केला आहे, की तो मेहता दाम्पत्यासाठी ओडिशातून आग्रा आणि दिल्लीतल्या त्यांच्या माणसांसाठी ड्रग्जची वाहतूक करत होता. प्रत्येक खेपेसाठी त्याला पाच लाख रुपये दिले जात होते. आशिष आणि शिवांगीशी आपण व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधत होतो, असा दावाही त्याने केला आहे. दरम्यान, गेंदातोला पोलिस स्टेशनमधले वरिष्ठ इन्स्पेक्टर ओमप्रकाश धुरू यांनी मात्र प्रवीणकडून असं कोणतंही मेमोरँडम आलं नसल्याचं सांगितलं. दरम्यान, ‘मिड-डे’शी बोलताना आशिष यांनी सांगितलं, की आपण कधीही छत्तीसगडमध्ये गेलेलो नाही आणि अशा व्यक्तीला कधीच भेटलेलो नाही. ‘माझी कष्टाने जमवलेली संपत्ती हडप करण्यासाठी कोणी तरी या खोट्या प्रकरणात मला गोवत आहे,’ असं त्यांनी सांगितलं. ‘ज्या कंपनीशी माझे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत, अशा एका कंपनीने गेल्या महिन्यात अचानक माझ्या बँकेशी संपर्क साधला आणि आर्बिट्रेशन कम्प्लेंट केली. ‘मी त्यांच्याकडून 200 कोटी रुपये रोखीने घेतले होते आणि ते मी त्यांना परत केले नाहीत. त्यामुळे माझं बँक खातं गोठवून त्यातली रक्कम आमच्याकडे द्यावी,’ असा दावा त्यांनी तक्रारीत केला होता. बँकेला हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी माझी खाती गोठवली. मी सध्या कोर्टात या प्रकरणी खटला लढतो आहे. आम्ही निष्पाप आहोत, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही दोघं सध्या वणवण भटकतो आहोत. आमच्याकडे दोन वेळच्या जेवणाइतकेही पैसे सध्या नाहीत. आयुष्यात इतका वाईट दिवस आम्ही कधीच पाहिला नव्हता,’ असं आशिष यांनी सांगितलं. ‘आमच्या चौकशीसाठी आलेल्या मध्य प्रदेश पोलिसांना भेटायला जात होतो; मात्र आमच्या वकिलाने आम्हाला सांगितलं, की पोलीस कदाचित आम्हाला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस कायद्याअंतर्गत अटक करू शकतात. आम्ही साधी माणसं आहोत. पोलीस चौकशीला कधीही सामोरे गेलेले नव्हतो. गेल्या महिन्यापर्यंत आमच्याविरुद्ध कोणतीही तक्रारही कधी नव्हती. त्यामुळे आम्ही वकिलांचं ऐकून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला; मात्र तो फेटाळला गेला. त्यामुळे आम्हाला अटक होणार हे निश्चित होतं. त्यामुळे लपून राहण्याव्यतिरिक्त आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आम्ही पोलीस चौकशीला तयार आहोत. तसंच, पत्नी शिवांगी हिचा माझ्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही,’ असंही आशिष यांनी स्पष्ट केलं. ‘माझी खाती बँकेने गोठवलेली असल्याने मी सध्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकत नाही; मात्र मी तुमचे पैसे बुडू देणार नाही. ती तुमची आयुष्यभराची कमाई आहे, याची मला कल्पना आहे. बँकेने खाती सक्रिय केली, की मी लगेच सर्वांचे पैसे करीन. मी काहीही वावगं केलेलं नाही. मी कठीण काळातून जात असून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी यातून नक्की बाहेर येईन,’ अशी ग्वाही आशिष यांनी गुंतवणूकदारांना दिली. वकील काय म्हणतात? या दाम्पत्याचे वकील हेमंत इंगळे यांनी सांगितलं, ही हे दाम्पत्य निष्पाप आहे. खोट्या आरोपांखाली अटक न होण्याची खात्री दिली, तर तपासाला सहकार्य करण्यास हे दाम्पत्य तयार आहे. मेहता दाम्पत्याच्या ब्लिस कन्सल्टंट्स या कंपनीविरोधात डेन्रॉन रिया-इट ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खोटी आर्बिट्रेशन कम्प्लेंट दाखल केल्याचं अॅड. हेमंत इंगळे यांनी सांगितलं. ‘त्यांनी कम्प्लेंट गेल्या महिन्यात दाखल केली आहे; मात्र त्यावर 21 ऑगस्ट 2021 अशी तारीख आहे. ही कथित कम्लेंट मेहता यांना माहितीच नव्हती. कथित सुनावणी किंवा कथित कराराबद्दल आशिष मेहतांना माहितीच नव्हतं. कथित आर्बिट्रेशन सुनावणीबद्दल त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर डॉक्युमेंट्स आल्यानंतरच प्रथम कळलं. डेन्रॉन कंपनीच्या घोटाळ्यात आशिष मेहता पीडित आहेत. आर्बिट्रेशन कम्प्लेंटपूर्वीही मेहता यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत केले आहेत. आता डेन्रॉनच्या घोटाळ्यामुळे त्यांना पैसे परत करणं शक्य होत नाहीये. अन्यथा गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास मेहतांची कंपनी तयार आहे. या संदर्भातलं अॅफिडेव्हटही मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलं आहे. डेन्रॉनने फाइल केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं, की त्यांनी पुणे कोर्टात सादर केलेली कागदपत्रं चुकीची आणि छेडखाड केलेली आहेत. डेन्रॉनने त्यात दिलेला पत्ता चुकीचा असून, त्या पत्त्यावर ऑफिस अस्तित्वात नाही,’ असंही अॅड. हेमंत इंगळे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Leave a Reply